उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेल्या नवाथे चौक येथील दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी बंधूभावाने रहावे. सर्व जात, पात, धर्म विसरुन दहीहंडीतील प्रेमाचा गोपालकाला एकमेकांना वाटून समाजात सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज येथे केले.
नवाथे चौक येथे आयोजित भव्य दहीहंडी कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह सिनेकलाकार शिल्पा शेट्टी, राजपाल यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंचावरील दहीहंडी श्रीफळाने फोडून कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. छत्री तलाव येथे श्री हनुमानजी यांची १११ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. श्री. फडणवीस यांच्या हस्ते त्या मूर्तीच्या प्रतिकृतीचे रिमोटव्दारे अनावरण करण्यात आले. हनुमान चालिसाचेही यावेळी पठण करण्यात आले. तसेच तिवसा व राऊर येथील निराधार कुटुंबांना घरकूल मंजूर झाले आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात घरकुलाचा ताबा लाभार्थ्यांना देण्यात आला.
Tags: NULL