भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केलेले आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
तब्बल ३७१ कोटी रुपयांच्या आंध्र प्रदेश कौशल्य विकास घोटाळ्यातील महत्त्वाचे सूत्रधार असल्याच्या आरोपावरून गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांना शनिवारी अटक केली होती. हे प्रकरण सन २०१४मधील आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळाच्या स्थापनेशी संबंधित आहे. बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देणे आणि अनंतपूर जिल्ह्यातील किआ सारख्या उद्योगांजवळील शैक्षणिक संस्थांशी संबंध वाढवणे हा या महामंडळाचा उद्देश होता.