भावीक श्रद्धेने आणि भक्तीभावाने येथे दर्शनाला येत असतात. मी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो आहे. येथे लाखो भक्त येत असल्याने शासनाने १४८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील ६८ कोटी विविध सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसेच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिमाशंकर येथे बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.