हैदराबाद संस्थानात जवळजवळ 200 वर्ष निजामाचे (असफशाही) राज्य चालले. प्रजा बहुसंख्य ‘हिंदू’ असूनही राजा मात्र ‘मुस्लिम’ होता. या दोनशे वर्षात सर्वात जास्त धर्मांध सहावा व सातवा (शेवटचा) निजाम होता. त्यांच्या काळात हिंदू धर्मीयांवर अनेक निर्बंध, नियम लादल्याचे व भेदभाव केल्याची माहिती मिळते.
महाराष्ट्रात गणपती बसवण्याची (श्री गणेश चतुर्थी) जुनी परंपरा होती. लोकमान्य टिळकांनी समाज जागृत करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. ब्रिटिश सरकार विरोधात जनजागृती करण्यासाठी अश्या उत्सवाचा खूप फायदा होत होता. पुण्यात सुरू झालेला हा गणेशोत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचायला वेळ लागला नाही. निजामाच्या अधिपत्याखाली असलेल्या तत्कालीन हैदराबाद प्रांतातही लोक मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरी करू लागले होते.
‘औरंगाबाद’ येथे उत्सव इतक्या थाटात साजरी होऊ लागला की हिंदू-मुस्लिमात तंटे होऊ लागले. कसबे आळंद येथे गणपती मिरवणूक मशिदीसमोरून नेण्यावरून असाच एक वाद निर्माण झाला. गैर मुसलमानांची कोणतीही मिरवणूक किंवा वाद्य मशिदीसमोरून जाणे म्हणजे इस्लामचा अपमान आहे, असे सांगत मुस्लिम लोकांनी गणपतीच्या मिरवणुकीला विरोध केला. त्या अगोदरही विविध सण उत्सवात मिरवणुक काढण्याला मुस्लिम समाजाचा हेच कारण सांगून विरोध असायचा. बालाजी रथ यात्रेदरम्यानही त्यांनी ‘कसबे टेकमाल’ येथे विरोध केला होता. ‘गणपती बसवणे’ ही हिंदूंची नवीनच प्रथा आहे, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून दंगा झाला. असे तंटे जागोजागी उत्पन्न होतायत असे कारण देऊन निजामाने नवीन उत्सव सुरू करण्यासाठी आणि एखाद्या उत्सवामुळे कोणती जात दुखावली जात असेन तर धर्म खात्याच्या प्रमुखांची परवानगी घेण्याची अट घातली.
हा हुकूम म्हणजे धर्मांधाच्या हाती कोलीतच होते. त्यामुळे कोणता गणपती जुना (कदीम) व कोणता नवा (जदीद) असे वाद सुरू झाले. ‘नव्याने गणपती उत्सव साजरा करणे म्हणजे इस्लामचा अवमान आहे’, अशी भूमिका नंतर शासनानेच मान्य केली. आजही स्वतंत्र भारतात अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाकडून हिंदूंना मिरवणूक काढण्यास व वाद्य वाजवण्यास विरोध केला जातो. लग्नाची वरात किंवा प्रेतयात्रा सुद्धा दुसऱ्या मार्गाने न्यावी लागते किंवा मशिदीसमोरून वाद्य थांबवून शांततेत नेण्यास भाग पाडले जाते.
असेच काही निर्बंध दसऱ्याच्या सणाला त्याचवेळी मोहरम असल्यामुळे घालण्यात आले होते व हिंदूंना कसलीही वाद्ये न वाजवता, घरातच शांततेत औपचारिक पूजा वगैरे आटोपून घ्यावी, मंदिरातही कोणते वाद्य वाजवू नये असा हुकूम काढण्यात आला होता. सन १९१७ व १९१९ मध्ये उपरोक्त हुकूम काढल्याची माहिती मिळते.
संदर्भ – कहाणी हैदराबाद लढ्याची, लेखक – नरेंद्र चपळगावकर
सौजन्य – विश्व संवाद केंद्र, देवगिरी