जैन धर्मियांसाठी हे पर्व म्हणजे सणांचा राजा. तेही फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात.
पर्यूषणाचा मूळ अर्थ आहे मनातील वाईट विचार दूर सारणे आणि वाईट सवयी सोडून देणे. या पर्वात उपासतापासाला तसेच गुरुवचन ऐकण्याला, ध्यानधारणा करण्याला महत्त्व असते. जैन धर्मीय तसेही कांदा, लसूण, बटाटा खात नाहीत. पण या पर्वकाळात त्यांच्या जोडीला हिरव्या पालेभाज्या, फळेही ते वर्ज्य करतात. काहीजण तर पाणीही पीत नाहीत.. सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापर्यंत अन्नप्राशन किंवा जलग्रहण करायला सर्वसामान्य जनांनाही मनाई असते. ते ही एक दोन दिवस नव्हे तर तब्बल ८-१० दिवस. इथे हे सांगणे आवश्यक आहे की श्वेतांबर पंथीय जैन ८ दिवस तर दिगंबर पंथीय १० दिवस हे पर्व साजरे करतात. ह्या पर्यूषण पर्वाचा इतिहास २५०० वर्षांचा आहे. भगवान महावीर यांनी याची सुरुवात केली. वर्षाऋतूत भिक्षूंनी एका ठिकाणी राहून आत्मशुध्दीसाठी चिंतन – मनन करावे हा यामागचा प्रमुख उद्देश होता. या काळात साधकाने क्षमा, दान, ऋजुता, संतोष, सत्यता, आत्मसंयम, उपास, वैराग्य, विनम्रता आणि सातत्य यांचे पालन करणे अपेक्षित आहे.
एकंदरीत हे पर्व साधकाला स्वतःच्या आत्म्याशी मैत्री करून आत्मशुध्दीसाठी संपूर्ण वर्षात केलेल्या पापांचे क्षालन करण्याची, क्षमाशील होण्याची संधी देते. स्वतःतील त्याग, तप व धैर्य वाढवण्याचे बळ देते. प्रेम व दयाभाव जागृत करून शत्रूलाही मित्र बनवते.
पर्यूषण पर्वाच्या अंतिम दिवसाला संवत्सरी असे म्हणतात. तेंव्हा संवत्सरी प्रतिक्रमण केले जाते. प्रतिक्रमण म्हणजे स्वतःच्या चुकांची निंदा करणे, त्या मान्य करणे. तद्नंतर त्यांच्यासाठी माफी मागणे. यामुळे त्या चुकांचे नामोनिशाण राहत नाही.
आत्मोन्नतीचे हे एक असे साधन आहे की ज्याच्या वर्षानुवर्षे पालन करण्याच्या सवयीने अधिकाधिक चित्तशुद्धी होऊन परमानंदाची अनुभूती घेणे संभव होऊ शकते..
स्मिता आपटे,
सौजन्य – सामिती संवाद , पश्चिम महाराष्ट्र