लातूर| निजामाच्या भारतदेश विरोधाचे, धर्मांध रझाकारांच्या पाशवी अत्याचारांचे आणि त्या विरोधात हैदराबाद संस्थानातील विशेषतः मराठवाड्यातील जनतेने देव, देश, धर्मरक्षणासाठी दिलेल्या तीव्र प्रतिकाराचे निरंतर स्मरण होणे आवश्यक आहे, याचा विसर पडू देऊ नका असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रचार विभाग प्रमुख मा. प्रमोदजी बापट यांनी केले.
सांस्कृतिक वार्तापत्र, पुणेच्या ‘लढा – मराठवाडा मुक्ती संग्रामाचा’- या विशेषांकाचे प्रकाशन लातूर येथे प्रमोदजी बापट यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.आर्यसमाजाचे प्रवर्तक, संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीचे हे २०० वे वर्ष आहे. स्वामीजींनी धर्मरक्षणासाठी आर्य समाजासारख्या जाज्वल्य संघटनेची स्थापना केली. ग्लानीत असलेल्या तत्कालिन धर्माची- समाजाची स्थिती आणि गती स्वामीजींनी नेमकेपणाने ओळखून सिंहबळाने कार्य केले आणि आर्य समाजाच्या देशभरात शाखा सुरु करुन धर्मरक्षणाचे वेगवान कार्य आकाराला आणले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतदेश स्वतंत्र झाला तरी निजामाच्या अधिपत्याखालील मराठवाडा हा पारतंत्र्यात होता. निजामाचा ओढा हा पाकिस्तानकडे अधिक असल्यामुळे त्याने आत्यंतिक भारतद्वेषातून आपल्याच राजवटीतील हिंदू जनतेवर अनन्वित अत्याचार करवले.
दिवसेंदिवस निजामाच्या हिंदूधर्मद्वेषी वृत्तीमुळे तत्कालिन समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु झाले. रझाकार ही सशस्त्र पाशवी संघटना स्थापन करुन समाजाचे दमन सुरु झाले. फाळणीच्या भयंकर वेदनांची आठवण होईल असे भीषण अत्याचार रझाकार सशस्त्र सेनेच्या माध्यमातून केले जाऊ लागले. हैदराबाद संस्थानात ठिकठिकाणी, लहान मोठ्या गावांत ही सेना स्त्रियांवर अत्याचार, आबालवृद्धांची छळवणूक करु लागल्यामुळे याविरोधात समाजमन पेटून उठले आणि प्रतिकार सुरु झाला. या सर्व ठिकठिकाणच्या प्रतिकारामागे आपला देव, देश आणि धर्म वाचवण्यासाठीची भावना होती.
Tags: NULL