टीम इंडियाचा फिरकीपटू कुलदीप यादवने श्रीलंकाआणि पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेण्याच्या बाबतीत इतिहास रचला आहे. तसेच सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा कुलदीप हा चौथा आणि भारतासाठी दुसरा गोलंदाज ठरला आहे. कुलदीपने श्रीलंकेविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आणि 4 विकेट्स घेतल्या होत्या तर कुलदीप यादव याने पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.
सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा कुलदीप यादव हा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत मोहम्मद शमी पहिल्या स्थानावर आहे. त्याने ८० सामन्यांत १५० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. मात्र, त्यानंतर कुलदीपने ८८ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आणि अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला.
कुलदीपने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी कानपूरमधील सराव सामन्यात गोलंदाजी केली आणि मला जाणवले की मी योग्य दिशेने काम करत आहे. भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतरही मी तसाच प्रयत्न केला. याआधी आयपीएलमध्येही माझी लय बिघडली होती. त्यामुळे ती सुधारण्यासाठी मला ६-७ महिने लागले होते. यापुढे लक्ष्य आता विश्वचषक २०२३ भारताला जिंकवून देणे आहे.”