महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी संजय पाटील यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच या पदाचा पदभार स्वीकारला आहे. याआधी ते राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे कोल्हापूर चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे.
संजय पाटील यांना प्रशासकीय सेवेच्या अनुभवासह चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राचाही प्रदीर्घ अनुभव आहे.यापूर्वी त्यांनी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक, पु.ल.अकादमीचे प्रकल्प संचालक, राज्य कर उप आयुक्त ( विधी विभाग ) आदी पदावर त्यांनी सेवा बजावली आहे.
संजय पाटील यांची लेखक, कवी, गीतकार, संवादलेखक आदी क्षेत्रातही नाव कमावले असून त्यांनी ‘जोगवा’, ‘दशक्रिया’, ‘बंदिशाळा’, ‘पांगिरा’ या चित्रपटांसाठी पटकथा, संवादलेखन, आणि गीत रचना केलेली आहे. तसेच ’72 मैल एक प्रवास’ या चित्रपटाचे गीतलेखन आणि संवादलेखन तर ‘हिरकणी’ व ‘रेती’ चित्रपटाचे गीतलेखन केले आहे. वरील त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.