संयुक्त राष्ट्रे, 13 सप्टेंबर : संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी बुधवारी भारताच्या G20 अध्यक्षतेचे कौतुक केले. नवी दिल्लीने ग्लोबल साउथच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वर्षभर चाललेल्या जी-२० गटाचे नेतृत्व करताना मोदींनी विकासाचा अजेंडा चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवला याबद्दलही त्यांनी कौतुक केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या G20 शिखर परिषद आणि भारतीय अध्यक्षपदाखाली सर्वसहमतीने स्वीकारलेल्या नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणेबाबत पीटीआयने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गुटेरेस यांनी पत्रकार परिषदेत ही टिप्पणी केली.
“भारताने केलेल्या या अध्यक्षतेला मी अभिवादन करतो. जगाच्या दक्षिणेचा आवाज ध्वनित करण्यासाठी भारताने आपल्या G20 अध्यक्षतेखाली सर्वोत्तम प्रयत्न केले आणि विकासाचा अजेंडा चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले.” असे गुटेरस यावेळी म्हणाले.