लीबियात आलेल्या भीषण पुरामुळे २० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लीबियाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आपत्ती असून यात मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश जणांचे मृतदेहही अजून सापडलेले नाहीत.लीबियातील डेरना शहराचा जवळपास अर्धा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
डेरना शहराचे महापौर अब्दुलमेनाम अल-घाइठी यांनी सांगितले की, शहरातील मृतांचा आकडा १८ ते २० हजारांवर पोहोचला आहे. इतकेच नाही तर आता महामारी पसरण्याची मोठी भीती ही त्यांनी व्यक्त केली आहे.कारण मृतदेह पाण्यात सडत असून पाण्यासह रस्त्यावर घाण वाहत आहे. त्यामुळे आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, जागतिक हवामान संघटनेचे म्हणणे आहे की, लीबियातील इतके मृत्यू टाळता आले असते. लीबियात गेल्या दशकभरापासून यादवी युद्ध सुरू असून तेथे दोन वेगवेगळी सरकारे प्रशासन चालवत आहेत. देशात हवामान विभाग देखील कार्यरत नाही.हवामान विभागाकडून आधी काही अंदाज वर्तवले गेले असते तर लोकांना वाचवता आले असते. पुराचा अंदाज वेळीच स्पष्ट झाला असता तर लोकांना आधीच कुठेतरी हलवण्यात आले असते, असे जागतिक संघटनेने म्हटले आहे.
तसेच याआधीच डेरमा हे शहराला धोका असल्याचे अनेक तज्ज्ञांनी सांगितले होते. समुद्रकिनारी असलेल्या या शहराला कधीही भीषण आपत्तीचा सामना करावा लागू शकतो असा इशारा आधीच देण्यात आला होता.