गणेश उत्सव सुरु होण्यास आता चार दिवस राहिले आहे. सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. सार्वजनिक गणेश मंडळे अंतिम टप्याच्या कामाला लागले आहे. त्याचवेळी यंदा प्रथमच काश्मीरमध्ये ‘गणपती बाप्पा मोरयाचा आवाज घुमणार आहे.
यंदा दीड दिवसांचा गणपती श्रीनगरमध्ये बसणार आहे. अगदी लाल चौकापासून पाचशे मीटर अंतरावर हा गणेशोत्सव होणार आहे. श्रीनगरमध्ये गणपतीयार ट्रस्टकडून श्रीच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करुन दीड दिवसानंतर त्याचे विसर्जन केले जाणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी पुणे शहरातील सात गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे.
पुण्यातील कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ, गुरुजी तालीम गणपती मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, केसरीवाडा गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ या सात मंडळांनी याकरिता पुढाकार घेतला आहे.त्यानुसार श्रीनगर येथील गणपतयार टेम्पलचे संदीप कौल आणि शिशांत चाको यांच्याकडे पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीच्या सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाची प्रतिकृती सुपुर्त करण्यात आली.
हा कार्यक्रम श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे उत्साहात पार पडला.यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनीत बालन, ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालिम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी ,तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, केसरी गणेशोत्सवाचे प्रतिनिधी अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले की,आज गणेशोत्सव इतर देशातही साजरा होतो.मग तो आपल्याच देशात काश्मीरमध्ये का नाही ? असा प्रश्न पडला आणि त्यामुळेच काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय आम्ही सर्व मानाच्या मंडळांनी घेतला. या माध्यमातून काश्मीर खोऱ्यात सामाजिक सलोखा वाढण्यासोबतच सुख-समृध्दीही वाढेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.