आशिया चषकातील सुपर ४ मधील अखेरची लढत आज होत आहे. कोलंबोमध्ये टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. दुपारी अडीच वाजता नाणेफेक होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअम मध्ये होणार आहे.
भारताने आशिया चषकाच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे.तर बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सामन्याचा गुणतालिकेवर कुठलाही परिणाम होणार नाही.मात्र भारतीय संघ हा सामना जिंकून विजयाची हॅट्रीक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
हवामान खात्यानुसार, भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान पाऊस पडू शकतो.कोलंबोमध्ये आज पावसाची 88 टक्के शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोलंबोमध्ये संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सामना काही काळ थांबवला जाऊ शकतो. मात्र, त्यानंतर पावसाची शक्यता फारच कमी आहे.