आता पाकिस्तानचा जवळचा सहकारी समजला जाणारा देश अरब अमीरातने {UAE ) देखील पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले आहे. आणि त्याचबरोबर संयुक्त अरब अमीरातने एका नकाशाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर भारताचा भाग असल्याचे दाखवून दिले आहे. हा पाकिस्तानसाठी एक मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार संयुक्त अरब अमीरातचे उप प्रधानमंत्री सैफ बिन जायद अल नाहयान यांनी दिल्लीत झालेल्या शिखर परिषदेचा एका व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये भारत मध्य-पूर्व-युरोप इकोनॉमिक कॉरिडोर दाखवण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे यूएईचे उप पंतप्रधान यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओत संपूर्ण काश्मीरला भारताचा भाग दाखवण्यात आले आहे. यावर पीओके आणि अक्साई चीनच्या भागाचा देखील समावेश आहे.पीओके हा तो भाग आहे ज्यावर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे.
भारताकडून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताचा भाग असल्याचा दावा खूप पूर्वीपासून केला जात आहे. नुकतेच भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील पीओके भारताचा भाग आहे आणि नेहमीच राहील असे म्हणले होते.