भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेअंतर्गत अवकाशात पाठवलेल्या आदित्य L-1या अंतराळयानाने चौथा टप्पा ‘अर्थ बाउंड मॅन्युव्हर’ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. इस्रोने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.’अर्थ बाउंड मॅन्युव्हर’ म्हणजे पृथ्वीभोवती फिरत असताना त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे अंतराळात प्रवास करण्यासाठी गती निर्माण करणे.
आदित्य एल 1 अजूनही पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत आहे. टप्याटप्याने आदित्य एल 1 चा कक्षा विस्तार सुरु आहे. म्हणजे पृथ्वीपासून ते लांब नेण्यात येत आहे. आतापर्यंत आदित्य एल 1 चा तीनवेळा यशस्वी कक्षाविस्तार झाला आहे. गुरुवारी रात्री आदित्य एल 1 वर चौथे मॅन्यूव्हर यशस्वी झाले आहे.
या मॅन्यूव्हर दरम्यान, पुढील प्रवासासाठी आवश्यक वेग प्राप्त केला जाईल. पाचव्या अर्थ-बाऊंड मॅन्यूव्हरच्या यशस्वी पूर्ततेनंतर, आदित्य एल-1 त्याच्या 110 दिवसांच्या प्रवासासाठी लॅग्रेंज पॉइंटकडे रवाना होईल.
या अंतराळयानाद्वारे सूर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, असे इस्रोने म्हटले आहे. आदित्य L-1 सोबत अनेक प्रकारची उपकरणे पाठवण्यात आली असून, त्याद्वारे सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे. सोलर फ्लेअर्स, कोरोनल मास इजेक्शन यासारख्या गोष्टींचा अभ्यास केला जाईल.