‘श्रावणमासी हर्ष मानसी’ अशा आनंदी वातावरणात सध्या आपण सर्व बागडतो आहोत. भारताने चंद्रावर स्वारी करून संपूर्ण विश्वात आपली सर्वांची मान अभिमानानं उंच केली आहे, पण त्यासोबतच आपण आपली संस्कृतीही विसरू शकत नाही. तिच्यामुळे संपूर्ण विश्वात आपले वेगळेपण उठून दिसते.
श्रावणात सणांची रेलचेल असते. पिठोरी अमावस्या, पोळा आणि मातृदिन या एकाच दिशेने जाणाऱ्या मूळ संकल्पना आहेत. श्रावणातली वद्य अमावस्या ही दर्भ-ग्रहणी अमावस्या म्हणून ओळखतात. या दिवशी काढलेले दर्भ पुढे अनेक दिवस चांगले राहतात व धार्मिक कार्यासाठी त्यांचा उत्तम उपयोग होतो. खानदेश आणि मध्य प्रदेशात याच दिवशी ‘पोळा’ नावाचे व्रत करतात. या व्रताचा संकल्प असा असतो, ‘मम इह जन्मनां जन्मांतरे वा सौभाग्य-पुत्र-फल-प्राप्त्यर्थं पिठोरी-व्रतम अहं करिष्ये.’ याचा अर्थ असा की मी हे व्रत सौभाग्य, पुत्र, पौत्र प्राप्तीसाठी करीन.
स्त्रीला मातृपद बहाल करणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. एका स्त्रीने मृत बालक जन्मल्यावर अरण्यात जाऊन योगिनींना प्रसन्न करून घेऊन त्याला जिवंत कराविले, अशी कथा भविष्य पुराणात सांगितलेली आहे. गर्भवती स्त्रीला आपली संस्कृती सांगते की शंभर मूर्ख मुलांपेक्षा एकच गुणवान मुलगा चांगला. निर्वीर्य व शत्रूला आनंद देणाऱ्या मुलाला कधीच जन्म देऊ नकोस.
पोळा हा सण खास करून शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या बैलांसाठी खूप महत्वाचा कारण बैल हा शेतकऱ्यांच्या घरातलाच एक सदस्य असतो. वर्षभर तो कष्ट करतो व त्याची जाणीव ठेवून शेतकरी या दिवशी त्याला नाऊमाखू घालतो. त्याचं आवडतं खाद्य त्याला खायला देतो. त्याला सजवतो. प्राण्याबद्दल सुद्धा चांगली वर्तणूक असावी हेच यातून आपली संस्कृती सांगते. पशुपक्ष्यांविषयी कमीपणाची भावना मनात येऊ नये, म्हणून त्यांना देवाचे वाहन बनवले आहे. उंदीर शेतीची नासाडी करतो म्हणून त्याला मारू नये, म्हणूनच त्याला गणपतीचे वाहन बनवले आहे. मोराला सरस्वतीचे वाहन बनवले, त्यामुळे त्याची सुंदर पिसं काढली जाऊ नये, हा त्याच्या मागे विचार आहे. आपली संस्कृती फक्त पशू व पक्ष्यांचा विचार करीत नाही तर झाडांचा, नद्यांचा, डोंगरांचा, मातीचा, दगडांचासुद्धा म्हणजेच निसर्गाचाही विचार करते. सूर्य – चंद्र तेसुद्धा आपल्या संस्कृतीच्या विचारकक्षेत येतात.
निर्जीवांचा सुद्धा विचार करणारी आपली संस्कृती मग आईला कशी विसरेल? मुळात जगनियंत्याने जगाची निर्मिती केली. त्यात मानव जात वाढवण्यासाठी स्त्रीची जबाबदारी मोठी मानली. स्वतः भगवान विष्णूंना मातृ हृदयाचे प्रेम – वात्सल्य अनुभवावे असे वाटले. तो मोह त्यांना आवरता आला नाही आणि मातेच्या पोटी जन्म घेतले. अर्थात मूळ उद्देश ‘परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां हाच होता. आई-वडिलांच्या ऋणात राहायला देवांनासुद्धा आवडते.
परंतु आज काय अवस्था आहे, काही ठिकाणी मातृ हृदयाची कदर करण्यापेक्षा रक्ताचं पाणी करून वाढवलेली मुले, आईच्या नोकरीतून, तिच्या कष्टातून मिळवलेल्या पैशासाठी भुकेली असतात. मुलांना जीवनाचे प्राथमिक शिक्षण, संस्कार रूपातून आई देते. त्यांना ती त्यागाचे महत्त्व, स्वतः त्याग करून घालून देते. पाश्चात्य संस्कृती, राहणीमान यांच्या अधीन जाणारी आजची मुलं, आई-वडिलांचा त्याग समजू शकत नाही. कर्तव्यपालनासाठी मुलाला उखळात कांडण्याचं धैर्य बाळगणारी माताच उत्तम संस्कार करू शकते. शिवाजीराजे घडले ते स्वतः जिजाऊंच्या संस्कारांमुळे . अशा मातेला मातृदिनाच्या कार्डात, त्या गुलाब पुष्पात अडकवता येईल का? आई-वडिलांचे संस्कार, त्यांचे मन लक्षात न घेता, नुसता कोरडा नमस्कार करून त्यांच्या ऋणांतून मोकळं होता येईल का? हा विषय त्यांच्या दिखाऊ प्रेमाने नाही, तर त्यांचं न संपणारे ऋण मनापासून स्वीकार करण्याचा आहे.
.
सौ. अनुराधा पाध्ये,
सौजन्य- समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र