केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी केरळमधल्या कोझिकोडे इथल्या निपाह विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजनांचा घेतला आढावा
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी केरळमधल्या कोझिकोडे इथल्या निपाह विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा, पुण्यामधील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेमधून (आयसीएमआर-एनआयव्ही) आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे, असे डॉ. पवार यांनी हा आढावा घेतल्यानंतर सांगितले.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसएल-3 प्रयोगशाळांसहित फिरत्या वाहनांनी सुसज्ज असलेली केंद्राची आणि आयसीएमआर-एनआयव्हीची उच्च स्तरीय पथके आधीच कोझीकोडे येथे दाखल झाली आहेत आणि ती पथके प्रत्यक्ष स्थानावर चाचण्या करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आऱोग्य राज्यमंत्र्यांनी दिली. कोझिकोडे भागातील बाधित ग्रामपंचायतींना विलगीकरण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे, असेही त्यांनी जाहीर केले. या परिस्थितीची हाताळणी करण्यासाठी राज्याला सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये पाठबळ देण्यासाठी डॉ. माला छाब्रा यांच्या नेतृत्वाखाली एक बहु-विषयतज्ञ पथक तैनात करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर-एनआयव्ही दैनंदिन तत्वावर परिस्थितीवर देखरेख करत आहे आणि विषाणूच्या या फैलावाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.