दिव्यांगांना सहानुभूती नको; समाजाचे सहकार्य व आशीर्वाद हवेत – राज्यपाल रमेश बैस
दिव्यांग व्यक्तींची ज्ञानेंद्रिय अधिक तल्लखपणे काम करतात. अनेक बाबतीत ते सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक चांगले काम करतात. दिव्यांग व्यक्तींना समाजाकडून सहानुभूती नको, तर त्यांना सहकार्य आणि आशीर्वाद हवेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
राज्यपालांच्या हस्ते अंध व्यक्तींच्या अखिल भारतीय ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राजभवन येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.
संसदेने पारित केलेले दिव्यांग व्यक्तींचे विधेयक तयार करणाऱ्या संसदीय समितीचे आपण अध्यक्ष होतो. समितीच्या शिफारशीनुसार दिव्यांग व्यक्तींची व्याख्या व्यापक करण्यात आली असून नोकरीमध्ये देखील दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली असल्याचे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.
Tags: NULL