देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या ‘वीरांना’ आदरांजली अर्पण करण्यासाठी 9 ऑगस्ट 2023 रोजी “मेरी माटी मेरा देश” हे देशव्यापी अभियान सुरू करण्यात आले.
12 मार्च 2021 रोजी सुरू झालेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’, या कार्यक्रमाचा समारोप म्हणून हे अभियान सुरु करण्यात आले असून, या मोहिमेला संपूर्ण भारतभर आयोजित करण्यात आलेल्या दोन लाखाहून अधिक कार्यक्रमांसह व्यापक जन सहभाग (जन भागीदारी) लाभला आहे.
या अभियाना अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक आणि सुरक्षा दलांसाठी समर्पित शीला फलक उभारण्यात आले असून, पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, विरों का वंदन यासारखे शूर वीरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाला वंदन करणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे.
मेरी माटी मेरा देश अभियानाच्या पहिल्या टप्प्याला व्यापक पोहोच आणि प्रचंड लोकसहभाग यासह, अभूतपूर्व यश मिळाले आहे. आतापर्यंत 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2.33 लाखांहून अधिक शीला फलक उभारण्यात आले आहेत. वेबसाइटवर आतापर्यंत जवळजवळ 4 कोटी पंचप्रण प्रतिज्ञा सेल्फी अपलोड करण्यात आल्या आहेत. शूरवीरांचा सत्कार करण्यासाठी देशभरात 2 लाखांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वसुधा वंदन संकल्पने अंतर्गत, 2.36 कोटीहून अधिक देशी रोपे लावण्यात आली असून, 2.63 लाख अमृत वाटिका तयार करण्यात आल्या.
देशभरात आयोजित करण्यात आलेल्या अमृत कलश यात्रांच्या माध्यमातून या अभियानाचा दुसरा टप्पा आता सुरु होत आहे. देशव्यापी मोहीम म्हणून, देशातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण भारताच्या ग्रामीण भागातील 6 लाख खेड्यांमधून आणि शहरी भागातील प्रभागांमधून माती आणि तांदूळ हे धान्य गोळा केले जात आहे. ग्रामीण भागात ते प्रभाग स्तरावर एकत्र करून प्रभाग-स्तरीय कलश तयार केला जाईल. प्रत्येक राज्याच्या राजधानी मधून हे कलश राजधानी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यक्रमासाठी समारंभपूर्वक पाठवले जातील. शहरी भागात, प्रभाग स्तरावर माती गोळा केली जात आहे आणि मोठ्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र करून राज्याच्या राजधानीमधून नवी दिल्ली येथे पाठवली जात आहे. ऑक्टोबर अखेरी पर्यंत 8500 पेक्षा जास्त कलश राजधानी दिल्ली येथे प्रमुख कार्यक्रमासाठी पोहोचतील असा अंदाज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची आठवण जागी ठेवण्यासाठी, भारताच्या कानाकोपऱ्यातून गोळा केलेली माती अमृत वाटिका आणि अमृत स्मारकाच्या परिसरात पसरली जाईल.