मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने अॅडमिरल दिवंगत एमपी आवटी यांच्या स्मरणार्थ 13 सप्टेंबर 2023 रोजी अगस्त्य सभागृह, आयएनएचएस अश्विनी येथे तिसरे वर्षाकालीन व्याख्यान आयोजित केले होते. लेखक, इतिहासकार आणि संशोधन अभ्यासक वेंकटेश रंगन या कार्यक्रमाचे अतिथी वक्ते होते.
‘प्राचीन भारतातील सागरी युद्ध मोहिमा’ या विषयावरील व्याख्यानात, रंगन यांनी भारताने प्राचीन काळात राबवलेल्या, धोरणात्मक सागरी युद्ध मोहिमांवर भाष्य केले, या मोहिमा सध्याच्या काळासाठीही बोधकारक ठरतील. व्याख्यानात त्यांनी प्राचीन काळातील दोन भारतीय सागरी युद्ध मोहिमांवर त्यांनी विस्तृत माहिती दिली. यामध्ये अकराव्या शतकात चोल सम्राट राजेंद्र चोल याने मिळवलेला विजय आणि अल-फॉ द्वीपकल्पामधील भारतीय समुदायाचे रक्षण करण्यासाठी चालुक्य सम्राटाने राबवलेल्या सागरी युद्ध मोहिमांचा समावेश होता. व्याख्यानामध्ये प्राचीन काळातही अस्तित्वात असलेल्या प्रभावी सागरी धोरणांचे महत्व, आणि सध्याच्या काळातील नौदलाच्या यशस्वी मोहिमा आणि धोरणात्मक निर्णयांवरील त्याचा प्रभाव, यावर भर देण्यात आला.
व्हाइस अॅडमिरल राजाराम स्वामीनाथन, एव्हीएसएम, एनएम, डीजीएनपी (मुंबई) यांनी अतिथी वक्ते वेंकटेश रंगन यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला नौदल कर्मचारी, इतिहासकार, विद्यार्थी आणि सागरी क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, असा वैविध्यपूर्ण श्रोतृगण लाभला.
व्याख्यानाचे रेकोर्डिंग मेरीटाइम हिस्ट्री सोसायटीच्या सोशल मीडिया हँडल्सवर पोस्ट केले जाईल.