केंद्र सरकारने बोलावलेलं संसदेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. हे अधिवेशन कशासाठी बोलवले आहे असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता. परंतु, आता या अधिवेशनाचे मुख्य कारण समोर आलं आहे. महिला आरक्षण विधेयक या अधिवेशनाचा केंद्रबिंदू असेल. लोकसभेत ते मांडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज लोकसभेतील आणि राज्यसभेतील सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्र्यांचे आणि खासदारांचे फोटोसेशन होणार आहे.
संसदेच्या दोन्ही सदनांमधील सदस्यांना मंगळवारी सकाळी ९ वाजता संसदेमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. जुन्या संसद भवनाच्या आवारात सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र घेतले जाणार आहे. त्यानंतर संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सर्व सदस्य एकत्र जमतील. तिथल्या स्नेहसंमेलनानंतर खऱ्या अर्थाने जुन्या संसद भवनातील अधिवेशनाचे कामकाज संपुष्टात येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज नव्या इमारतीमध्ये सुरू होईल.