गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सदस्यांनी आज नव्या संसद भवनात प्रवेश केला आहे.आजपासून नव्या संसद भवनात कामकाज चालणार आहे. महिला आरक्षण विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत मांडले .यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण सगळ्यांनी नवा इतिहास रचला आहे.असे काही क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. आज असाच एक क्षण आला आहे. नव्या संसदेच्या पहिल्या सत्रातील पहिल्या भाषणात मी खूप विश्वास आणि गर्वाने सांगतोय की आजचा हा दिवस खूप खास आहे. आजच्या या दिवशी मी ‘नारी शक्ती बंधन अधिनियम’ अर्थात महिला आरक्षण विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडत आहे.
महिलांच्या नेतृत्वात देशाचा विकास हा आमचा संकल्प आम्ही पुढे नेत आहोत. आमचे सरकार एक प्रमुख संविधान संशोधन विधेयक सादर करत आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांच्या भागीदारीचा विस्तार करणे, हे या विधेयकाचे लक्ष्य आहे. आम्ही आज ‘नारी शक्ती बंधन अधिनियम’ सादर करत आहोत. याच्या माध्यातून आपली लोकशाही अजून मजबूत होईल. मी देशातील माता, बहिणी आणि मुलींना नारी शक्ती बंधन अधिनियमासाठी शुभेच्छा देतो.असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
महिला आरक्षण विधेयकांतर्गत विधानसभेच्या 33 टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. याशिवाय लोकसभेतही महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. म्हणजेच, 181 जागा महिलांसाठी राखीव असतील. तसेच, दिल्ली विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे.