जानेवारी-ऑगस्ट 2023 या कालावधीत देशांतर्गत विमान कंपन्यांनी 1190.62 लाख प्रवाशांची केली वाहतूक
वेळापत्रकानुसार कार्यरत देशांतर्गत विमान सेवा रद्द होण्याचे एकूण प्रमाण 0.65 % इतके कमी आहे
वर्ष 2023 च्या पहिल्या आठ महिन्यांत देशांतर्गत विमान वाहतूक उद्योगाने प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ अनुभवली आहे. ताज्या उपलब्ध माहितीच्या विश्लेषणानुसार, जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधीत देशांतर्गत विमान कंपन्यांकडून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची संख्या 1190.62 लाखांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्येत 38.27% ची लक्षणीय वाढ झाली आहे.
केवळ एका ऑगस्ट 2023 महिन्यात प्रवासी संख्येत 23.13% ची लक्षणीय मासिक वाढ दिसून आली, या महिन्यात प्रवासी संख्या 148.27 लाखांपर्यंत पोहोचली. विमान प्रवासी वाढीतील हा वरचा कल या उद्योगाची लवचिकता आणि जागतिक महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटातून सावरल्याचे द्योतक आहे.
प्रवासी वाहतुकीत प्रभावी वाढ झालेली असताना, हे लक्षात घेण्यासारखे आहे की ऑगस्ट 2023 मध्ये वेळापत्रकानुसार कार्यरत देशांतर्गत विमान सेवा रद्द होण्याचा एकूण दर केवळ 0.65% होता. ऑगस्ट 2023 दरम्यान, नियोजित देशांतर्गत विमान कंपन्यांकडून एकूण 288 प्रवासी-संबंधित तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्या प्रति 10,000 प्रवाशांच्या प्रमाणात केवळ 0.23 तक्रारी होत्या. हा कमी तक्रार आणि विमाने रद्द होण्याचा दर, हा ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देण्याच्या आणि प्रवाशांना विश्वासार्ह आणि कार्यक्षम सेवा प्रदान करण्याच्या या उद्योगाच्या प्रयत्नांना मिळालेला दाखला आहे.
या क्षेत्रातील वाढीचे कौतुक करताना, केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया, म्हणाले की, या क्षेत्रात होणारी ही सातत्यपूर्ण वाढ म्हणजे सुरक्षित, कार्यक्षम आणि ग्राहक-केंद्रित विमानचालन सेवेला चालना देण्यासाठी विमान कंपन्या, विमानतळ आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या एकत्रित प्रयत्नांना मिळालेला दाखला आहे. विमान सेवा उद्योग प्रवासाच्या वाढत्या मागण्या आणि नियमांशी जुळवून घेत प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. जसजसा हवाई प्रवास वाढत जाईल तसतशा देशांतर्गत विमान कंपन्या संपूर्ण भारतातील आर्थिक वाढ आणि कनेक्टिव्हिटी सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहतील.