भारत – रशियामध्ये राजकीय आणि वैचारिक नाते आहे. याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या शहराला सिस्टर सिटीची परंपरा लाभली आहे. या सिस्टर सिटी संदर्भात भविष्यात होणाऱ्या सामंजस्य करारामुळे रशिया आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील, असे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले. महाराष्ट्र विधिमंडळात रशियाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. मुंबई-सेंट पीटर्सबर्गमधील प्रस्तावित सामंजस्य करारासंदर्भात विचार विनिमय या भेटीदरम्यान करण्यात आला.
अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले की, मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या दोन्ही शहरांना सिस्टर सिटीची ५५ वर्षाची परंपरा आहे. या सिस्टर सिटी संदर्भातील सामंजस्य करारामुळे दोन्ही शहरांसह देशांतील नागरी, कृषी, व्यापार संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी सहकार्य लाभणार आहे. रशिया भारताचा जुना मित्र देश असून, संसदीय, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पद्धतीच्या देवाणघेवाणीमुळे उभय शहरासह देशांमध्येही नाते वृद्धिंगत होणार आहे. करारावर चर्चा करण्यासाठी भारतास भेट दिल्याबद्दल अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी यावेळी शिष्टमंडळाचे आभार मानले.
Tags: NULL