राज्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे आणि माहेरवाशीण गौरींचे आज विसर्जन होणार आहे. बुधवारी गौरींचे आगमन झाले . तर काल त्यांचे घरोघरच्या रितीरिवाजांनुसार पूजन करण्यात आलं. गौरींना वस्त्र अलंकारांनी सजवून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून, धनधान्याची समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना करण्यात आली. आज या गौरींचे विसर्जन होत आहे.
गौरीचे आगमन आणि विसर्जन हे नक्षत्रानुसार होते. ज्या नक्षत्रामध्ये त्यांचे आगमन होते, त्याच्या पुढच्या नक्षत्राला त्यांचे विसर्जन होते. अनुराधा नक्षत्राला गौरीचे आगमन होते आणि मूळ नक्षत्राला तिचे विसर्जन होते. नक्षत्र कधी कधी पुढे-मागे होतात; त्यानुसार कधी हे विसर्जन पाचव्या दिवशी होते; तर कधी सातव्या दिवशी होते.असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी गौरी सोबत पाच दिवसांच्या गणपतीचेही विसर्जन केले जाते. गौरी-गणपती विसर्जनासाठी, सर्वच जिल्ह्यांमधली प्रशासन व्यवस्था सज्ज झाली आहे. मुंबईतील समुद्रकिनारे आणि तलावांच्या ठिकाणी विसर्जनसाठी मुंबई महानगरपालिकेकडून खास व्यवस्था करण्यात आली आहे.