शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकांची आज सुनावणी होणार असून महाराष्ट्र विधिमंडळाच्यावतीने दोन्ही गटांतील ५४ आमदारांना नव्याने नोटीस बजावून आज दुपारी तीन वाजता विधानभवनात सुनावणीसाठी बोलावले आहे. अपात्रतेसंबंधीच्या पूर्वीच्या सर्व याचिका एकत्र करून ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
शिवसेना आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिरंगाई न करत आठवडाभरात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते तसेच निकालाची कालमर्यादा देखील ठरवण्यास सांगितले होते . सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजपासून या प्रकरणावर पुढील सुनावणी घेणार आहेत.
यापूर्वी 14 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज या प्रकरणातील दुसरी सुनावणी घेतली जात आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांनी दिल्लीत जाऊन कायदेशीर सल्लामसलत करून रणनीती ठरवल्याचे बोलले जात आहे.
अनेक काळ लांबलेल्या या सुनावणीकडे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे. तसेच आजच्या सुनावणी दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर येण्याची शक्यता आहे.असे स्वतः नार्वेकर यांनी संकेत दिले आहेत.