सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. दसरा, दिवाळी पर्यंत दुकाना बाहेर मराठी पाट्या लावून आर्थिक उलाढाल वाढवा असे या निर्णयामध्ये म्हणण्यात आले आहे. मराठी पाट्यांबाबतच्या कोर्टाच्या निकालाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली, असे राज ठाकरे म्हणाले. तसे च दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा आणि इथले सरकार लक्ष ठेवेलच , कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांचे पण लक्ष असेल हे विसरु नका, असा इशाराही त्यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.
कोर्ट कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा, अशी कानउघडणी करत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्याची ही नामी संधी आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत मुंबईसह राज्यभरातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या दिसण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.