भगवान श्री विष्णूंच्या दहा अवतारांपैकी पाचवा ‘वामन’ अवतार. वामनाचे प्राकट्य भाद्रपद द्वादशीला झाले म्हणून भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन जयंती म्हणून मानतात.
भगवंताच्या दहा अवतारांच्या कथा आणि त्यांचे महत्त्व अनेक पुराणांमध्ये वर्णन केले आहे. हे अवतार पाहता ‘मत्स्य – कूर्म – वराह’ असे मानवी शरीर नसलेले काही अवतार आहेत. प्राणी आणि मनुष्य यांचे संमिश्र रूप असलेला सिंह आणि माणूस असा ‘नरसिंह’ अवतार आहे. मत्स्य म्हणजे जलचर मासा, कूर्म म्हणजे उभयचर कासव आणि वराह हा भूचर प्राणी रूपातील अवतार दिसतो. यानंतर पाचवा अवतार हा बटू वामनाचा.
भागवत पुराणात याची कथा सांगितली आहे. देव आणि असुर यांच्या युद्धात असुरांचा पराभव होतो. असुरांचे गुरू शुक्राचार्य आपली संजीवनी विद्या वापरून राक्षसांना जिवंत करतात. असुरांचा राजा बळी याला अस्त्रे, चिलखत, अद्भुत शक्ती देतात. यानंतर इंद्राची राजधानी अमरावतीवर असुर हल्ला करतात. इंद्रदेव घाबरून भगवान विष्णूंकडे जातात. तेव्हा विघ्ने दूर करण्यासाठी महर्षी कश्यप आणि माता अदितीच्या पोटी भगवान बटूच्या रूपात जन्म घेतात. तोच हा वामन अवतार, आज वामन जयंतीचा दिवस.
बटू वामन रूपातील भगवान श्रीविष्णू भिक्षेमध्ये बळीराजाकडे तीन पावले भूमी मागतात. एका पावलात स्वर्ग, दुसर्या पावलात पृथ्वी व्यापल्यावर ‘तिसरे पाऊल मी कुठे ठेवू?’ असे भगवान विचारतात. तेव्हा राजा बळी आपले डोके पुढे करतो, आणि बटू वामनरूपी भगवान डोक्यावर भार देऊन राजाला पाताळात ढकलतात. – अशी ही कथा.
राजा सत्त्वगुणी होता, पण सत्त्वगुणाचा अहंकार वाढल्यामुळेच तो अहंकार गाडण्यासाठीच भगवंताला अवतार घ्यावा लागला.
पृथ्वी, त्यावरील साधनसंपत्ती, जल – वायू – सौर असे ऊर्जास्रोत वापरून मिळवता येतील तेवढी सुखाची साधने आपल्याला मिळावी, त्यावर फक्त आपलाच ताबा असावा असे आजही अनेक राष्ट्रांना वाटते. तेव्हाही याला अपवाद नसावा. पृथ्वी आणि तिचे भवताल नष्ट होण्याची भीती असल्याने तिच्या रक्षणासाठीच हा वामन अवतार !
मीरा जोशी.
सौजन्य – समिति संवाद – पश्चिम महाराष्ट्र प्रांत