वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता राज्यात उद्या म्हणजे गुरुवारी होत आहे. बाप्पाला जल्लोषात निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळाची जोरात तयारी चालू आहे.ढोलपथक, नेत्राकर्षक देखावे , स्पिकर्स ह्या सगळ्याची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे.
पुण्यात लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या मार्गांवरुन विविध मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. विसर्जन मिरवणुकीनिमित्त शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.शहर पोलिसांकडून यंदा 28 सप्टेंबर रोजी निघणाऱ्या मिरवणुकीत अनेक नियमांचे पालन करण्याच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. यात मिरवणुकीत भाग घेणार्या ढोल ताशा पथकांच्या संख्येवर आणि विसर्जन तलावांच्या मार्गावर मंडळ थांंबण्याच्या वेळेवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
तसेच विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबई वाहतुक पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. काही रस्त्यावर वाहतुक आणि पार्किंगलाही बंदी असेल. बंद करण्यात येणाऱ्या मार्गांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था वाहतूक विभागाने केली आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी गिरगाव, ठाकूर द्वार, व्हीपी रोड, जे एस एस रोड, एस व्ही पी रोड, राजाराम मोहन रॉय रोड, कफपरेड मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी आवश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचा सल्ला मुंबई वाहतुक पोलिसांकडून देण्यात येत आहे.
मुख्य विसर्जन सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. बाँबशोधक नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दलाची तुकडी बंदोबस्तास राहणार आहे.