यावर्षी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनंत चतुर्दशीला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मंडळांनी नियोजन करताना पावसाचा अंदाज बांधून मग नियोजन करावे , असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
राज्यात पूर्व विदर्भापासून तर दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भ वगळता राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ७२ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असून पुणे, मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुणे शहरात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक पावसाच्या आगमनामुळे गणपती दर्शनाला आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली होती तर धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर पाण साचले होती. यामुळे वाहनचालकांची दमछाक झाली होती. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.