अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी येत असून असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन उद्या गुरुवारी पार पडणार आहे. मात्र याच दिवशी ईद-ए-मिलाद हा सण देखील आहे. पण ईद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचे मुस्लीम समुदायाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवार अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी आहेच पण आता शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.