दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज बाप्पांचे विसर्जन होत आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी मुंबई, पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात आहेत. गणेश विसर्जनाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही मोठी गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यासाठी लालबाग-परळसाठी विशेष पोलीस व्यवस्था ठेवण्यात आली आहे
विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस प्रशासन सज्ज झाली आहे. ९ हजार पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरभर तैनात करण्यात आले आहेत. शहरातील सर्व मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. १८०० पेक्षा अधिक सीसीटीव्हीची करडी नजर आज या मिरवणुकींवर असणार आहे. शहरात जड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. २००० पेक्षा अधिक गणेश मंडळांच्या गणपतीचं आज विसर्जन होणार आहे.
मुंबईमध्येही जल्लोषात निघणाऱ्या मिरवणुका पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. गिरगाव, दादर, जुहू, मालाड, मालवणी टी जंक्शन आणि गणेशघाट पवई यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. महापालिकेनेही नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जनस्थळांवर गर्दी हाताळण्याच्या दृष्टीने सिद्धता केली आहे. मध्य रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रवाशांसाठी १० विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सीएसएमटी – कल्याण, ठाणे, बेलापूरदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.