स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डाॅ. एम. एस. स्वामिनाथन यांचे आज निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकर्यांना अधिक उत्पादन देण्यास मदत करणाऱ्या धानाच्या उच्च-उत्पादक जाती विकसित करण्यात स्वामिनाथन यांचा मोठा वाटा होता. स्वामीनाथन यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीना आणि तीन मुली सौम्या स्वामीनाथन, मधुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन आहेत.
त्यांनी चेन्नईमध्ये एमएस स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली होती. 1971 मध्ये मिळालेल्या मॅगसेसे पुरस्कारासह 1986 मध्ये अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
डाॅ. एम. एस. स्वामिनाथन यांनी आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत नाजूक काळात, त्यांच्या कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यामुळे लाखो लोकांचे जीवन बदलले आणि आपल्या देशासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित केली.असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हणले आहे.