मुंबईसह राज्यभरात एकीकडे गणेश विसर्जनासाठी धामधूम सुरु असताना, दुसरीकडे पावसानेही दमदार हजेरी लावली. मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून येऊन तुफान पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अंधेरी, गोरेगाव, दादरसह गिरगाव चौपाटी याआधी हवामान विभागानेही पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला होता.
मुंबईत भर दुपारी अंधार पसरला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. या भर पावसातही अनेक गणेश मंडळांनी आपल्या मिरवणुका चालूच ठेवल्या होत्या . मुंबईच्या रस्त्यांवर कार्यकर्त्यांची गर्दी आणि कोसळणारा पाऊस असं चित्र होतं. अंधेरी, दादर परिसरात पावसाचा जोर इतका होता की त्यामुळे दृष्यमानताही कमी झाली. त्याशिवाय विजांचा कडकडाटही भीतीदायक होता.
पुण्यातही मानाच्या गणपतींची मिरवणूक चालू असताना जोरदार पाऊस झाला, मात्र या पावसातही ढोल पथकांचे गणेशापुढचे वादन चालूच राहिले. आणि भाविकांची गर्दीही कायम राहिली.