दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा किंवा इतर नोटांमध्ये बदलून घेण्यासाठी आजचा एकच दिवस बाकी आहे असे जाहीर करण्यात आले होते मात्र आता रिझर्व्ह बँकेने हा कालावधी वाढवला आहे.
दोन हजार रुपयांच्या नोटा अद्याप जमा किंवा बदली केल्या नसल्यास त्या आता ७ ऑक्टोबर पर्यंत बँकेत जमा करणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँकेने एक सप्टेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार रुपयांच्या ९३ टक्के नोटा परत आल्या आहेत.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार ७ ऑक्टोबर नंतर 2000 रुपयांच्या नोटा स्विकारल्या जाणार नाहीत. सोबतच सर्क्युलेशनमधून देखील दोन हजार रुपयांची नोट बाद होणार आहे.
रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. तसेच या आधी नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा कराव्यात किंवा त्या इतर मूल्यांच्या नोटांसह बदलून घ्याव्यात, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले होते. मात्र आता ही मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.