चार दिवसीय रत्न -आभूषण प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन
दागदागिन्यांच्या ग्राहक व आश्रयदात्या अधिकांश महिला आहेत. तरी देखील रत्न आभूषण उद्योग क्षेत्र आजही पुरुष प्रधान आहे, हा विरोधाभास आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला पुढे येत असताना रत्न आभूषण उद्योग क्षेत्रात येण्यासाठी महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे चौथ्या रत्न व आभूषण प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आयोजक संस्था ‘ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल’चे अध्यक्ष सैयम मेहरा, उपाध्यक्ष राजेश रोकडे, माजी अध्यक्ष आशिष पेठे, पु.ना. गाडगीळ आणि सन्सचे सौरभ गाडगीळ, सेन्को गोल्डचे शुभंकर सेन तसेच रत्न व आभूषण क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.
रत्न व आभूषण उद्योग जगातील सर्वाधिक जुन्या उद्योगांपैकी असून या उद्योगाचे देशाच्या विकासात फार मोठे योगदान आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असून स्वित्झर्लंडने ज्या प्रमाणे घड्याळाच्या निर्मितीमध्ये नाव कमावले आहे त्याप्रमाणे भारताने रत्न आभूषण उद्योगामध्ये जगात नाव कमावले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
Tags: NULL