चीनमधील हाँगझोऊ शहरात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत एकूण ५६ पदके जिंकली आहेत. यामध्ये १३ सुवर्ण, २१ रौप्य आणि २२ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताला सोमवारी रोलर स्केटिंगमध्ये दोन कांस्यपदके मिळाली आहेत. एकूणच या क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळाडू आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करत आहेत.
भारतीय खेळाडूंनी रविवारी विविध खेळात दमदार प्रदर्शन करत एका दिवशी तब्बल १५ पदक जिंकण्याचा विक्रम रचला.यानंतर सोमवारी भारताने महिला टेबल टेनिस दुहेरीत इतिहास घडला आहे. भारताच्या टेबल टेनिसपटू सुतीर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांनी महिला टेबल टेनिस दुहेरीत भारताला कांस्यपदक जिंकून दिले आहे. भारताने पहिल्यांदाच महिला टेबल टेनिस दुहेरीत पदक जिंकले आहे.भारताने यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये पदके जिंकली आहेत. मात्र,महिला दुहेरीत भारतीय जोडीने पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.