विदुषी आरती अंकलीकर यांच्या बहारदार गायनाने दुसऱ्या स्वरयज्ञ महोत्सवाची सांगता
पुणे प्रतिनिधी : एस एन बी पी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येरवडा येथे आयोजित दुसऱ्या “स्वरयज्ञ” संगीत महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी आरती अंकलीकर यांनी बहारदार गायन सादर केले. त्यांना तबला साथ आंतरराष्ट्रीय किर्तीचे तबलावादक पं. रामदास पळसुले यांनी केली. दोन दिवसीय संगीत महोत्सवाची सांगता त्यांच्या गायनाने झाली. त्यांनी सुरुवातील राग बागेश्री सादर केला व त्यानंतर अवघा रंग एक झाला या भैरवीतील अभंगाने आपल्या गायनाची सांगता केली.
आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली त्यावेळी सुरुवातीस पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांची मने जिंकली. त्यानंतर पद्मश्री पंडित सतीश व्यास यांनी आपल्या संतूरवादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. पं. रामदास पळसुले, पं. प्रताप पाटील, श्री. संतोष घंटे, श्री. विनायक गुरव यांनी कलाकारांना साथसंगत कली.
दोन दिवसीय “स्वरयज्ञ” संगीत महोत्सवाचे काल शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध सितारवादक सितारनवाज उस्ताद उस्मान खान साहेब, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध गायक पंडित अजय पोहनकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी. के. भोसले,संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झाले.
महोत्सवाच्या पहिल्या सत्राची सुरुवात एस एन बी पी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाने झाली. तसेच पंडित रतन मोहन शर्मा, उस्ताद रफिक खान, उस्ताद शफिक खान, पंडित मनमोहन कुंभारे, पंडित प्रताप पाटील, युवा गायिका अंजली नंदिनी गायकवाड, श्री संतोष घंटे, श्री विनायक गुरव असे संगीत क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज कलाकारांचे सादरीकरण झाले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, संस्थेच्या संचालिका देवयानी भोसले व एडवोकेट ऋतुजा भोसले, संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अशा प्रकारचा शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित करण्यामागे पूर्व पुणे भागात शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार करणे हा एस एन बी पी विद्यालयाचा मुख्य हेतू आहे असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी. के. भोसले यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.