यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.न्यूक्लिओसाइड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या याच शोधामुळे जागतिक महामारी ठरलेल्या कोविड-19 विरुद्ध प्रभावी ठरलेली mRNA लस विकसित करणे शक्य झाले आहे. त्यांच्या या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेण्यात आली. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी कोरोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये ह्या पुरस्काराची घोषणा केली आहे.
यंदाच्या वर्षीच्या नोबेल पुरस्करांची घोषणा होण्यास वैद्यकशास्त्रातील पुरस्काराने सुरुवात झाली आहे.येत्या काही दिवसांत विज्ञानाबरोबरच साहित्य, अर्थशास्त्र व शांततेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना या पुरस्कारांची घोषणा केली जाणार आहे.
या वर्षी सर अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी १० डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये एका समारंभात स्विडनच्या राजाच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील.
वर्षभरात मानवतेसाठी मोलाचे योगदान देणाऱ्यांना नोबेल पुरस्कारांनी गौरविण्यात येते हा पुरस्कार अनेक क्षेत्रांमध्ये दिला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते . स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाइटचे शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.