चिनी फंडिंगच्या आरोपांनी घेरलेल्या न्यूज क्लिक या न्यूजपोर्टलशी संबंधित पत्रकार आणि लेखकांवर आज सकाळपासून दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. या पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त, करण्यात आले आहेत. यामध्ये पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासह संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मीं यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी तपासादरम्यान अनेक डिजिटल पुरावेही जप्त केले आहेत. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आणि हार्ड डिस्कचाही समावेश आहे.
या न्यूजपोर्टलला काम करण्यासाठी चीनकडून निधी मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. दिल्लीशिवाय नोएडा आणि गाझियाबादमध्येही पोलीस अनेक ठिकाणी शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच जवळपास ३८ कोटींचे फंडिंग चीनकडून आल्याचा आरोप केला आहे. याबाबत भाजपकडूनही पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समोर आले आहे.
ऑगस्टमध्येच, अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करताना न्यूज क्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांचा दिल्लीतील फ्लॅट जप्त केला होता.काही दिवसांपुर्वी,अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने दावा केला होता की,न्यूज क्लिक अश्या एकदा जागतिक नेटवर्कचा भाग आहे ज्याला अमेरिकन उद्योगपती नेव्हिल रॉय सिंघमकडून निधी मिळतो. विशेष म्हणजे सिंघम कथितरित्या चायना कडून फंडिंग घेऊन चायनीज प्रपोगंडा पसरवण्यासाठी काम करतो ,असे या बातमीमध्ये स्पष्ट करण्यात आले होते.