चिनी फंडिंग प्रकरणात न्यूजक्लीक या न्यूज पोर्टलशी संबंधित 9 पत्रकारांवर दिल्ली पोलिसांनी सकाळी छापेमारी केली आहे . बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा अर्थात UAPA कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे.
ताज्या माहितीनुसार,वरिष्ठ पत्रकार अभिसार शर्मा, उर्मिलेश यादव , एनडीटीव्हीचे माजी एमडी अवनिंदो चक्रवर्ती आणि इतर सहा पत्रकारांना चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तसेच सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या घरीही दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली असून यावेळी मुंबई पोलिसही उपस्थित आहेत.तीस्ता सेटलवाड आणि गौतम नवलखा यांच्यावरही चीनकडून न्यूजक्लीकद्वारे मिळालेला फंड घेतल्याचा आरोप आहे.
दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून न्युजक्लिकवर UAPA च्या कलमांखाली IPC च्या १५३A (दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), IPC १२०B (गुन्हेगारी कट) असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या संस्थेला चीनकडून निधी मिळाल्याच्या आरोपांमुळे ही संस्था दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या रडारवर आहे. हा निधी बेकायदेशीररीत्या प्राप्त झाला असून त्याची कागदपत्रे अधिकाऱ्यांना देण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ईडीच्या तपासात या संस्थेमध्ये तीन वर्षांच्या अल्प कालावधीत ३८.०५ कोटी रुपयांच्या विदेशी निधीची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.