नांदेड येथील शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे. मृतांमध्ये ६ मुले व ६ मुलींचा समावेश असल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या घटनेची नोंद घेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात दाखल ७० रुग्णांची स्थिती चिंताजनक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. गंभीर रुग्णांमध्येही अनेक बालकांचा समावेश असल्याचे समजते. दरम्यान आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. त्यात चार नवजात बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. सात रुग्णांच्या मृत्यूनंतर मागील ४८ तासात मृत्यूचा आकडा ३१ पर्यंत पोहचला आहे. त्यात १६ नवजात बालकांचा समावेश आहे.
औषधाच्या तुटवड्यामुळे रुग्णांनी प्राण गमावले असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे . तसेच या रुग्णालयात सीटी स्कॅन, सोनोग्राफी, रक्त तपासणी सुविधा नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून वैद्यकीय शिक्षण खात्याचे आरोग्य पथक चौकशीसाठी रवाना होणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ लवकरच नांदेड येथे पोचून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत .
नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण ह्या शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. यावेळी रुग्णालयातील स्वच्छतागृह हे अतिशय घाणेरड्या स्थितीत होते.अनेक शौचालय हे ब्लॉक होते. काही ठिकाणी तर स्वच्छतागृहदेखील नव्हते, असे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील म्हणाले आहेत. . रुग्णालयात सर्व अनागोंदी कारभार सुरू असून दोषींवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.