राजधानी दिल्लीत यंदा जल्लोषात गणेश चतुर्थी झाली. गणरायाला नमन करून नारी शक्तीचाही जागर महिला आरक्षण विधेयकाला संसदेतील नव्या वास्तूतील विशेष अधिवेशनात मिळालेल्या मंजूरीने झाला. बाप्पांच्या भक्तांनीच नव्हे तर ठीक ठिकाणच्या वाढत्या गणेश मंडळातून मनोभावे प्राणप्रतिष्ठा पूजा आरती आणि आदरातिथ्य करण्यात आले. राजाश्रय आणि निर्बंधमुक्त असेल तर सगळेच सण उत्सव दिमाखात संपन्न होतात हे यानिमित्ताने महाराष्ट्रातील गल्लीपासून राजधानी दिल्लीच नव्हे तर देशविदेशातील प्रमुख शहरांतील उशिरापर्यंत सुरू असलेल्या मिरवणूकींतील झॉंकींच्या झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे.
सगळ्यांचा लाडका श्री गणेश , विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता, बुध्दीदाता गणपती त्याचे आगमन ते विसर्जन मिरवणूक हा एक उत्सव भक्तांना गुण्यागोविंदाने एकत्र आणतो. तेव्हा पोटाची खळगी भरायला परदेशापासून परप्रांता पर्यंत पोहचलेला मराठी माणूस मायभूमी महाराष्ट्रापासून दूर अश्यावेळी अधिकच आतुरतेने आप्तस्वकीयांची भेट होऊन इतरवेळी चे ‘आयसोलेशन’ दूर व्हावे यासाठी गणेशोत्सवाची वाट पाहत असतो. अश्या वेळी दिल्लीकरांना गुरुग्राम, फरिदाबाद, द्वारका ते अगदी दिल्ली हाट आय. एन. ए., लक्ष्मी नगर, नोएडा आणि मराठी मंडळांच्या शाळा नूतन मराठी, चौगुले पब्लिक स्कूल मायेने साद घालतात. ही साद बाप्पांचे दर्शन, स्नेहीजनांच्या भेटी, गप्पा गोष्टी, गाण्याच्या मैफली, विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन ते अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून परप्रांतीयांना मिळालेलं ज्ञान त्यावर आधारित बाप्पांची भक्ती याविषयीच्या गंमती जमती रंगवून एकमेकांना ऐकवणं हे ही बृहन्महाराष्ट्रातील गणेशोत्सवांचे वैशिष्ट्य असते.
येथील अमराठी मंडळी गणपतीच्या आरतीनंतर मूळ मराठी माणूस जी आरती, कर्पूरगौर म्हणतो ते ‘हिंदी’ भाषिक त्यांच्या शिरस्त्यानुसार थेट ‘ओम जगदीश हरे ‘ सुरू करतात आणि एक सूरातील आरती नकळत बेसुरात बदलते गंमत गोंधळ उडतो आणि आम्ही या क्षणांचे नेहमीच साक्षीदार असतो ! इतकेच नव्हे तर बाप्पांच्या मूर्तीचे दूरुन दर्शन न घेता अगदी दोन हातांनी मूर्तीला स्पर्श करुन नमस्कार करण्याचे प्रसंग ही आमचं मनोरंजन करतात. याशिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाही बृहन्महाराष्ट्रीनां उत्सुकता होती ती सार्वजनिक उत्सव समिती नवी दिल्ली येथील प्राणप्रतिष्ठा आणि उत्तर पूजेला येणाऱ्या पाहूण्यांची आणि श्री. गणेश सेवा मंडळ येथे आरतीला येणाऱ्या अतिथींची हा मान यंदा सार्वजनिक उत्सव समिती येथे माजी नौदल प्रमुख, व्हाईस अॅडमिरल सतीश घोरमाडे आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती श्री. देशमुख यांना मिळाला. श्री गणेश सेवा मंडळाचे अध्यक्ष संस्थापक श्री.महेद्रं लढ्ढा यांच्या वाढत्या जनसंपर्कातून केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूकमंत्री श्री.नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री श्री.प्रल्हाद पटेल यांची बाप्पांच्या दर्शनाला उपस्थिती आणि त्यांच्या हातुन आरती हे या गणेश मंडळाचे आकर्षण ठरले. गणेशोत्सवात एकत्रित येणाऱ्या भक्तांसाठी राजधानी दिल्लीत सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असते.
यात आय .टी. चे हब असलेलं गुरुग्राम येथील सार्वजनिक गणेशोत्सव समिती नेहमीच अग्रेसर असते. यंदा महाराष्ट्राचा लाडका गायक ऋषीकेश रानडे यांची गाण्याची मैफिल ‘जीवन- संगीत’ हे आकर्षण होते. या मंडळातील उत्साही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमानंतर होणारा उशीर आणि गुरुग्राम बाहेरील काही रसिक श्रोत्यांकरिता काहींच्या घरी गुरुग्राममध्येच निवासव्यवसथादेखील केली होती. चांदनी चौक येथील महाराष्ट्राची लोकधारा ‘लावणी’ अनेकांचे आकर्षण होती.
तसेच ‘हास्य जत्रा लाईव्ह’ हया निखळ हसवणा-या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक श्री.वीरेंद्र उपाध्ये, नीना हेजिब यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवातील रविवारी सार्वजनिक उत्सव समितीने लोधी रोडवरील चिन्मय सभागृहात केले होते. या कार्यक्रमाला दिल्लीस्थित सगळयाच क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून खळखळून हसत हास्यजत्रेचा आनंद घेऊन नियोजनाला दाद दिली. ‘दिल्ली हाट’ आय. एन. ए. येथील गणपतीमंडळ ख-या अर्थाने ‘गणेशोत्सव ग्लोबल’ करतो. तेथील विविध राज्यांतील व्यावसायिकांच्या कपडे ते खाद्य दालनावर दिवसभर परदेशी पाहूण्यांपासून भारतभरातून येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ सुरू असते. पर्यटक संध्याकाळी आपसूकच क्षुधाशांती करिता आकर्षक ‘महाराष्ट्र फूड’ च्या स्टॉलवर रेंगाळतात आणि तेथुन समोरच नजरेच्या टप्प्यात असलेले वैशिष्ट्यपूर्ण बाप्पाच्या आयडॉलला (मूर्तीला) कौतुकाने बघण्यास मंडळाच्या मांडवाखाली येतात .संध्याकाळच्या वेळात तेथील विद्युत रोषणाई आणि शेजारीच असलेल्या व्यासपीठावर सुरू असलेल्या महाराष्ट्रातील कलाकारांच्या अदाकारीला ही ते नमन करतात .
तेथील सांस्कृतिक कार्यक्रमात यंदा ठाण्याच्या कथ्थक नृत्यांगना वर्षा जाधव, डोंबिवली येथील दिपाली काळे, भावगीते गायिका देवयानी नातू यांच्य टीमसह सार्वजनिक उत्सव समितीने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले होते. या कार्यक्रमातून हिंदी मराठी गाण्यांची आणि नृत्यांची सुंदर प्रस्तुती तेथील देशविदेशातील प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली. याचे संयोजन नीना हेजिबांच्या मार्गदर्शनाखाली निवेदिता वैशंपायन, आरती कुलकर्णी, हेमांगी सिन्हा यांनी केले.
दरम्यान सध्या भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. यातच शिवराज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष हा एक दुग्धशर्करा योग आहे . आजही छत्रपतींचे जाज्वल्य हिंदवी स्वराज्य आणि त्यांचा पराक्रम प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय आहे. याचे स्मरण ठेवून ‘दिल्ली मराठी प्रतिष्ठान’ने दिलेल्या सादाला दिल्ली नोएडा फरिदाबाद ते एन. सी. आर.मधील गणेशमंडळाने उदंड प्रतिसाद दिला. गणेशोत्सवात शिवाजी महाराजांची थोरवी, पराक्रम नव्या आणि युवा पिढीपर्यंत आणि महाराष्ट्राची परंपरा गडकिल्ल्यांची महती तेथील आरास देखाव्यातून पोहोचवण्याची संकल्पना दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे मांडली होती . ही संकल्पना नूतन मराठी विद्यालय, चौगुले पब्लिक स्कूलने तर शाळेतील पूर्ण दोन वर्गातून शिवराज्याभिषेकाचे भव्य देखावे साकारुन उभी केली.
Tags: NULL