मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज काही वेळापूर्वी पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक पार पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली आणि मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. . या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.मागच्या वर्षीच्या आनंदाचा शिधा या संचात रवा, चणा डाळ, साखर आणि खाद्यतेल असे चार जिन्नस होते. मात्र आता यामध्ये मैदा आणि पोहे या दोन जिन्नसांची भर पडली आहे.
राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.
आनंदाचा शिधा या संचात १ किलो साखर, १ लीटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा दिला जाईल. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चासदेखील आजच्या कॅबिनेट बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
तसेच कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.