सिक्कीममध्ये अचानक उत्तर भागातील ल्होनक तलावावर ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आहे . ज्यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे.यामुळे भारतीय लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवनही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासानाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर परिस्थितीनंतर चुंगथांग धरणातून पाणी सोडल्यानंतर खालच्या भागात देखील पाण्याची पातळी १५ ते २० फूटांपर्यंत वाढली. यामुळे सिंगतमजवळ बारदांग येथे लष्कराची ४१ वाहने वाहून गेली आहेत. तीस्ता नदीला आलेल्या पुरात मेल्लीमध्ये नॅशनल हायवे १० वाहून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती आहे. तीस्ता नदीला लागून असलेला भाग रिकामी करण्यात आला आहे. राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच पश्चिम बंगाल सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आहे. सिक्कीमच्या गंगटोक येथून पर्यटकांची सुटका करण्यात येत आहे.
भाजप नेते उग्येन त्सेरिंग ग्यात्सो भुतिया यांनी सांगितले , “सरकारी यंत्रणा शोध आणि बचावकार्यात गुंतली आहे. बेपत्ता नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सिंगताममध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही लोक बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.