चीनमधील हाँगझोऊ शहरात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारत विविध क्रीडाप्रकारांमध्ये सरस कामगिरी करत यशाकडे वाटचाल करत आहे. एकूणच या क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आजच्या ११ व्या दिवशी भारताची सुरुवात कांस्यपदकाने झाली. भारतीय मिश्र संघाने ३५ किमी धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले. तर तिरंदाजी मिश्र सांघिक कंपाऊंड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
अशा प्रकारे भारताने आतापर्यंत एकूण ७१ पदके जिंकली आहेत.यामध्ये १६ सुवर्णपदके २६ रौप्यपदके आणि २९ कांस्यपदकांचा समावेश आहे.भारताने आतापर्यंत ७१ पदके जिंकली असून आता या स्पर्धेत भारत १०० च्या वर पदक जिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ७४ वर्षांच्या इतिहासातील हा भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम विक्रम आहे. यापूर्वी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने सर्वाधिक ७० पदके जिंकली होती. ज्यामध्ये १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांचा समावेश आहे. देश पदकतालिकेत ८ व्या क्रमांकावर होता, मात्र भारताने यापूर्वी कधीही इतकी पदके जिंकली नव्हती.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या कामगिरीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी भारतासाठी हा ऐतिहासिक तसेच अभिमानास्पद क्षण असल्याचे म्हणले आहे आणि या यशाचे मानकरी असलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.