डोमिनिकन रिपब्लिकच्या उपराष्ट्रपती, महामहीम श्रीमती रॅक्वेल पेना रॉड्रीग्ज यांनी आज (3 ऑक्टोबर, 2023) भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
भारत आणि डोमिनिकन रिपब्लिक यांच्यातील पंचवीस वर्षांच्या राजनैतिक संबंधांच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधणारी, त्यांची, या भेटीची वेळ अतिशय सुयोग्य आहे; असे भारताच्या दौऱ्यावर प्रथमच आलेल्या उपराष्ट्रपतींचे स्वागत करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. लोकशाहीच्या सामायिक मूल्यांच्या भक्कम पायावर आधारित असलेले, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण आहेत, तसेच जागतिक मुद्द्यांवर आपल्या दोघांचे विचार एकमताचे असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.
डोमिनिकन रिपब्लिक हा लॅटिन अमेरिकेतील भारताचा आठवा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असल्याचे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. व्यापार उद्यीमात अधिकाधिक वैविध्य आणण्याची क्षमता या देशात असल्याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला.
औषधी उत्पादने, सागरी विज्ञान, हवामानशास्त्र, आपत्ती विरोधक पायाभूत सुविधा आणि डिजिटल पेमेंट तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्यास आणि आमच्या अनुभवाची आणि कौशल्याची देवाणघेवाण करण्यास भरपूर वाव आहे, असे ही त्या म्हणाल्या.
क्षमता विकास हा भारत-डोमिनिकन रिपब्लिक सहकार्याच्या महत्वपूर्ण स्तंभांपैकी एक आहे,असे राष्ट्रपती म्हणाल्या.अलीकडेच भारताने डॉमिनिकन रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा आणि रिमोट सेन्सिंग या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी दोन विशेष आयटीईसी प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित केले होते, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं
दोन्ही देशांतील सतत होत असलेली देवाणघेवाण आणि संपर्क आमचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करतील यावर दोन्ही देशांतील नेत्यांनी या भेटीत सहमती दर्शवली.