विविध देशांचा ‘वर्ल्ड ट्रेड एक्स्पो’ मध्ये सहभाग
भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी – २० शिखर परिषदेच्या यशानंतर भारताचे जागतिक पटलावर महत्त्व अधोरेखित झाले आहे. विविध देश आज व्यापार विस्तारासाठी चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताकडे पाहत आहेत. युवा लोकसंख्येच्या रुपाने भारताला आणखी एक लाभांश मिळाला आहे. या महत्त्वाच्या वेळी आयोजित करण्यात आलेले जागतिक व्यापार प्रदर्शन विविध देशांमध्ये व्यापार सहकार्य व विकास वाढविण्याच्या दृष्टीने मैत्रीपूर्ण पुलाचे कार्य करेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील जागतिक व्यापार केंद्र येथे मंगळवारी (दि. ३) दोन दिवसांच्या चौथ्या जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजतर्फे जागतिक व्यापार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यापार, तंत्रज्ञान व पर्यटन’ या विषयावर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पर्यटन हा जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक झाला आहे. गेल्या वर्षी एकट्या भारतातून १.८० कोटी पर्यटक विविध देशांत गेले व ६१ लाख विदेशी पर्यटक भारतात आले. देशांतर्गत १७.३१ कोटी पर्यटकांनीदेखील पर्यटनाला चालना दिली.
महाराष्ट्र उद्योग व गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वांत आकर्षक राज्य असून राज्यात पर्यटन विकासाच्या अनेक संधी आहेत. वर्ल्ड ट्रेड एक्स्पोच्या माध्यमातून विविध देशांना आपल्या देशातील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाच्या संधी दाखविण्याची तसेच राज्यातील व्यापाराच्या शक्यता जाणून घेण्याची संधी मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले.
व्यापार प्रदर्शनात सहभागी सर्व देशांनी महाराष्ट्राशी सहकार्य वाढवावे व इतर क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवनवी क्षितिजे शोधावीत अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
Tags: NULL