विश्वचषकाचे सामने सुरू असतानाच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवून देण्याचा खळबळजनक ई-मेल एनआयएला मिळाला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याची माहिती देण्यात आली आहे.
एनआयएला मिळालेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये अज्ञात आरोपीने गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याला तुरुंगातून मुक्त करण्याची मागणी केली असून ५०० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.अन्यथा पंतप्रधान मोदी यांची हत्या तसेच मोदी स्टेडियम बॉम्बने उडवून देवू, अशी धमकी आरोपीने ई-मेल द्वारे दिली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला धमकीचा ई-मेल मिळाला असून त्यानंतर आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये पोलीस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे.