बरोब्बर १३० वर्षांपूर्वी म्हणजे १८९३ साली ६ ऑक्टोबर या दिवशी बंगाल प्रांतातील सिओराताली या छोट्याश्या गावात मुसळधार पाऊस आणि धडकी भरवणारा विजांचा कडकडाट चालू होता.
त्या कोलाहलात जगन्नाथ साहा यांच्या घरात एका बालकाचा जन्म झाला. आणि त्याचं नावं ठेवलं गेलं मेघनाद !
किराणा मालाचां छोटेखानी व्यवसाय करणाऱ्या जगन्नाथ साहा यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती त्यात मेघनाद यांना आणखी दोन भाऊ होते. सगळ्यांच्या शिक्षणाचा खर्च अशक्य होता. पण मेघनाद बुद्धीने अतिशय तल्लख म्हणून डॉ. अनंत दास ह्यांनी त्यांच्या रहाण्याची आणि शिक्षणाची जबाबदारी घेतली.
तो काळ पारतंत्र्याचा होता. बंगालच्या फाळणी विरुद्ध बंड पेटून उठले होते. कुमार मेघनाद त्यात सहभागी झाले आणि शिक्षा म्हणून त्यांची शाळेतून हकालपट्टी झाली. पण सुदैवाने दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळाला आणि ढाका विभागातून प्रथम क्रमांकाने त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
पुढे सत्येंद्रनाथ बोस यांच्या बरोबर प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये शिकताना प्रफुलचंद्र राय आणि जगदीश चन्द्र बसू या शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.
कलकत्ता विद्यापीठात द्वितीय क्रमांकाने BSC आणि MSC केलेल्या मेघनाद यांना सरकारी नोकरी मात्र मिळाली नाही कारण त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता…..
पुढे विज्ञान क्षेत्रात अभ्यास करून आयोनायझेशनचा सिद्धांत त्यांनी मांडला.
अलाहाबाद विद्यापिठात १५ वर्षे काम करणाऱ्या मेघनाद यांनी तब्बल ८८ शोधनिबंध लिहिले.
१९४० साली टाटांकडून मिळालेल्या ६०,००० रू च्या अनुदानातून त्यांनी सायकलोट्रोन तयार केला आणि भारतात अणू ऊर्जा संशोधनाचा पाया घातला गेला.
अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता.
बंगाल प्रांतात वारंवार येणारे पुर आणि होणारे नुकसान त्यांनी अनुभवले होते. त्यावर उपाय म्हणून नद्यांची खोली वाढवण्याच्या विचाराचा त्यांनी पाठपुरावा केला. त्यातूनच दामोदर व्ह्यली कॉर्पोरेशन ची स्थापना होऊन अनेक धरणे बांधली गेली.
खगोलशास्त्रातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. इन्स्टिट्यूट ऑफ थर्मल न्यूक्लियर फिजिक्स आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना करण्याव्यतिरिक्त, त्यांनी साहा समीकरण आणि आयनीकरणाचा सिद्धांत विकसित केला.
मेघनादजींच्या खगोलशास्त्रीय संशोधनातून महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त निष्कर्ष निघाले आणि त्यानंतरचे बहुतेक संशोधन त्यांच्या कल्पनांद्वारे मार्गदर्शन केले गेले असे मानले जाते. त्यांनी साहा समीकरण प्रस्तावित केले, ज्याने त्वरीत लोकप्रियता मिळवली आणि ताऱ्यांमधील भौतिक आणि रासायनिक परिस्थितीचे स्पष्टीकरण प्रदान केले. ते एक तेजस्वी खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि स्वातंत्र्याचे चॅम्पियन होते. त्यांनी भारतीय दिनदर्शिकेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे.
रत्नप्रभा पाठक ,कोपरगाव
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र