राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह नेमके कोणाचे ? या प्रकरणावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर येणार आहेत. या सुनावणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक आयोगात दाखल झाले आहेत.
यापूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. शरद पवार गटाकडून पक्षात फूट पडली नसून शरद पवार हेच अध्यक्ष असल्याबाबत वारंवार सांगण्यात आले आहे.
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत पक्ष आणि चिन्हाचा वाद सुरू झाला असून अजित पवार गटाने त्यावर आपला दावा केला आहे. अजित पवारांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे.
दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट कोर्टात याचिका दाखल केली आहे या याचिकेत त्यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आगामी काळात घडणाऱ्या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत.आज निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी हे युक्तीवाद करणार आहेत